चमकदार त्वचा आणि लांबसडक केस कोणाला नको असतात? यावर मार्केटमध्ये खूप सारी उत्पादने उपलब्ध असली तरी, नैसर्गिक अशा अनेक गोष्टी आहेत ज्यां आपल्या सौंदर्यात भर टाकतात. यापैकी एक सर्वात सोपा उपाय म्हणजेच हर्बल टी. हे हर्बल टी फक्त शरीर शुद्ध ठेवत नाहीत तर त्वचा आणि केसांचे पोषण देखील करतात. चला तर मग जाणून घेऊया अशा हर्बल टी विषयी जे तुमच्या सौंदर्यासाठी उपयुक्त आहेत.
1. ग्रीन टी (Green tea) :
दररोज सकाळी एक कप ग्रीन टी घेतल्याने त्याचा आपल्या त्वचा आणि केस या दोघांसाठी चांगला उपयोग होतो.
ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट आणि पॉलीफेनोल्स मुबलक प्रमाणत असतात आणि तेच आपल्या त्वचेवरील विषारी घटक दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर केसांच्या फोलिकल्स्ना मजबूत करून केसगळती कमी करण्यास देखील ग्रीन टी मदत करते.

2.कॅमोमाइल टी (Chamomile tea):
रात्री झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाइल टी घेतल्याने शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होते. या दोन्हीही गोष्टी आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. यामधील नैसर्गिक तेल त्वचेला चमकदार बनवते आणि केसांना मऊपणा देते.

3. पुदिना टी (Peppermint Tea):
दुपारच्या वेळी दिवसातून एकदा पुदिना टी घेणे फायदेशीर ठरते. पुदिना टी घेतल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात तसेच आपल्या शरीरातील रक्ताभिसरण देखील सुधारते आणि याचाच उपयोग आपल्याला केसांच्या वाढीसाठी होतो.

4. हिबिस्कीस टी (Hibiscus Tea):
एक दिवसआड करून हिबिस्कीस टी घ्यावा आणि जर याची चव छान हवी असेल तर त्यामध्ये मध घालून या चहाचा स्वाद वाढवू शकता. जास्वंदाचे फुल हे त्वचा आणि केसांसाठी सुपरफुड मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन C आणि अमिनो ऍसिड असतात जे कोलेजन तयार करतात त्यामुळेच केसांच्या मुळांना बळकटी मिळते.

5. डॅन्डेलियन टी (Dandelion Tea):
सकाळी नाश्ता केल्यानंतर एक कप डॅन्डेलियन टी घ्या. हा टी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो त्यामुळे आपली त्वचा तिचा निखळपणा टिकवते. यातील खनिजे आणि व्हिटॅमिन केसांच्या मुळांना पोषण देतात, त्यामुळेच केस अधिक दाट आणि चमकदार होतात.

* हर्बल टी पिताना साखरेऐवजी मध वापरा.
* पुरेसे पाणी आणि पौष्टिक आहारासोबत हे चहा घेतल्यास ते अधिक परिणाम देतात.
* नियमित वापर केला तरच याचा फरक तुम्हाला दिसेल त्यामुळे सातत्य ठेवा.


